Saturday, December 28, 2013

काश्मीरनामा- कॉलेजेस, सिलॅबस आणि...

जम्मू मध्ये प्रवेश केल्यापासून जवळपास प्रत्येक रस्त्यावर शाळा-कॉलेजमध्ये जाणारी पोरं-पोरी दिसतात.  जम्मू शहर तर राहूच दे, पण पूंछ सारख्या बॉर्डरवरच्या गावातही जवळपास प्रत्येक मुलगा-मुलगी किमान १२वी पर्यंत तरी शिक्षण घेतोच. संपूर्ण जम्मू मध्ये फिरताना भारत सरकारने इतर काही नाही तरी किमान किमान शिक्षणाच्या बर्‍याच संधी जम्मू मध्ये दिल्याचं बघून बरही वाटतं. पण शिक्षक-विद्यार्थ्यांशी बोलल्यावर आणि शिक्षणाविषयीच्या 'आपल्या कल्पना' आणि 'वस्तुस्थिती' अनुभवल्यावर हे समाधान अजिबातच टिकत नाही.

"इथल्या पदव्यांवर फारसा चिश्वास ठेवण्यात अर्थ नाही" पूंछ जिल्ह्यातल्या एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्रिन्सिपलनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं. "आमची पदवी म्हणजे तुमची जेमतेम १२वीच म्हणा! इथे जास्तीत जास्त लोक 'साक्षर' कसे झालेत याला महत्त्व आहे. 'सुशिक्षित', 'प्रॅक्टिकल नॉलेज' वगैरे शब्द विद्यार्थ्यांच्या द्रुष्टीने म्हत्त्वाच्या असतीलही कदाचित, पण सोयीच्या राजकारणासाठी आम्हाला किती विद्यार्थी 'पास' झाले हे महत्त्वाचं. मग त्यसाठी सोपा सिलॅबस ठेवणं, पेपर्स तपासताना तितकसं स्ट्रिक्ट न रहाणं या गोष्टी खपून जातात, किंबहुना अपेक्षितच असतात."

जम्मू मधल्या कॉलेजेसमधून डिग्री घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी चांगली नोकरी मिळवून किमान स्वत:ची आणि आपल्या परिवाराची अर्थिक स्थिती तरी सुधारत असावेत आणि अशा तरुणांची संख्या वाढली की एकंदरित संपूर्ण जम्मू-काश्मीरची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पण नक्की सुधारेल, अशा काहिशा टिपिकल मध्यमवर्गीय 'आयडिअलिस्टिक' विचारसरणीला जम्मू मधली वस्तुस्थिती मुळापासून हलवून टकते.

एस. एस. बी. ची एन्ट्रन्स एक्झाम घेण्यासाठी मी पूंछ, रजौरी आणि मेंढारमधील काही स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घेतली. माझ्याबरोबर काम करणारे सगळे  प्रोफेशल कोर्स करणारे विद्यार्थी होते. "डिग्री घेतली की पूढे काय?" या प्रश्नाचं उत्तर भयानक होतं.

"सरकारी नोकरी!"  प्रत्येकाचं ठरलेलं उत्तर.

"सरकारी नोकरी नाही मिळाली तर?"

"घरची शेती!" बी. बी. ए. करणारा वसिम सांगतो "भात शेतीतून फारसं काही मिळत नाही पण ६-७ महिने काळजी नाही."

"मला तसं टेन्शन नाही. आमची वडिलोपार्जित तीन दुकानं आहेत. माझ्या दोन्ही काकांना मुली असल्यामुळे ते सगळं मलाच मिळणार आहे" सी. एस. करणार्‍या पौरिशची प्रतिक्रिया.

"यांच ठीक आहे." इंग्जिनिअरिंग कराणारा आरिफ सांगत होता "माझे बाबा ६ वर्षांपासून गायब आहेत. आजोबांनी जमीन विकून माझी कॉलेजची फी भरलीय. बिझनेस करायला तर सोडा दोन वेळचं धड जेवता येइल, इतकेही पैसे आमच्याकडे नाहियेत. सरकारी नोकरी नसेल तर दुसर्‍यांच्या शेतात मजूरी करणार्‍याशिवाय माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही!"

"अरे मग दिल्ली किंवा चंदिगढ ला का नाही जात नोकरीसाठी?" मी अस्वस्थ होत विचारतो

"माझे आजोबा, आई, मित्र सगळे इथेच रहाणार! इथून निघून जाणं म्हणजे या सगळयांशी गद्दारी आहे आणि ती मी कधीच करणार नाही." आरिफचं बॉलिवूड स्टाइल उत्तर!

'भारतापासून तूटत चाललेल्या काश्मीरी तरुणाला  वैचारिकदृष्ट्या भारतीयत्वाशी जवळ आणण्यासाठी आपण शाळा-कॉलेजेसमध्ये काही  प्रयत्न करतोय क?'  या प्रश्नाचं उत्तर तर अवाक कराणारं होतं.

 "इथे टिचिंगकडे फक्त सरकारी नोकरी एवढ्याच दृष्टीकोनातून पाहिलं जातं. आणि थोडे फार आयडिअलिस्टिक विचार करणारे शिक्षक असतात, पण त्यांना इथल्या सामाजिक परिस्थितीमुळे गप्प बसावां लागतं" बी. एड. कॉलेजमधले एक शिक्षक सांगत होते

"म्हणजे?" मला खरोखरच काहीही झेपलेलं नव्हतं

"माझं नाव घेऊ नका कुठे"  खास 'आतली' बातमी सांगतोय या आवाजात त्यांनी स्पष्टीकरण दिलं "एखादा हिंदू शिक्षक मुस्लीम विद्यार्थ्यावर रागावला किंवा उलटं जरी झालं, तरी हा 'धार्मिक' इश्यू बनतो. अर्थात आम्ही भारतीयच आहोत, पण भारताचे भर वर्गात भारताची स्तूती करणे किंवा पाकिस्तानला शिव्या घालणे म्हणजे स्वतःहून आपला जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. कधी तथाकथित 'आझाद कश्मीरचे' चे सैनिक आम्हाला  'राष्ट्राचा शत्रू' ठरवतील आणि कधी मूडदा पाडतील, याचा नेम नाही!"


जर जम्मूमध्ये आपण 'डिग्री आणि नोकरी' एवढा प्रॅक्टिकल ऑप्शनही देऊ शकत नसू आणि 'वैचारिक प्रग्ल्भता' रुजवण्याचा आयडिअलिस्टिक ऑप्शन पण नाकारत असू तर एवढ्या भरमसाठ संख्येने उघडलेल्या शाळा-कॉलेजमधून आपण शिक्षणाच्या नावाखाली नक्की करतोय कय? या प्रश्नाचं उत्तर घेऊनच मी 'पूंछ' ला अलविदा केलंय!